२०२२०६१५

डॉ. हेडगेवार भवनातील साडे तीनचा चहा !

 डॉ. हेडगेवार भवनातील साडे तीनचा चहा !



शीर्षक वाचून दचकलात ना? डॉ हेडगेवार भवन-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यालय. सामान्यतः नागपुरात संघ बिल्डींग याच नावाने ओळखले जाणारे हे लाखो करोडो संघ कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे प्रेरणास्थान व ऊर्जा केंद्र. साळुबाई मोहिते वाडा! संघ कार्यालय ! डॉ हेडगेवार भवन अश्या विविध नावाने ओळखले जाणारे हे पवित्र स्थान मात्र अस्सल महाली किंवा नागपुरकरांना विचारले तर तो म्हणेल संघ बिल्डिंग! अनेक पिढ्यांपासून इथल्या बहुतेक परिवाराचे टपाली पत्ते संघ बिल्डींग, महाल, नागपुर-४४०००२ ( आता ३२) असेच आहेत.

संघ कार्यालयाकडे जाणारे सर्वच रस्ते (?) हे अरुंद बोळी किंवा गल्ल्या असून साधारणपणे प्रमुख मार्ग सांगायचा झाल्यास बडकस चौकाकडून अयाचित मंदिराकडे जाताना उजवीकडे असलेली पहिलीच गल्ली ही सरळ संघ कार्यालय -डॉ हेडगेवार भवनात जाते.

परमपूजनीय डॉ हेडगेवार यांनी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर त्यांच्या नवी शुक्रवारी येथील राहत्या घरी संघाची स्थापना केली. स्वयंसेवक विविध आखाड्यात जात असत. बहुतांश स्वयंसेवक अण्णाजी खोत यांच्या नागपुर व्यायाम शाळेत जात. या ठिकाणी दत्तोपंत मारुळकर व अण्णा सोहोनी हे प्रशिक्षक होते. पुढे जशी जशी संख्या वाढत गेली तशी जागा कमी पडू लागली त्यातूनच दत्तोपंत मारुळकर यांनी महाराष्ट्र व्यायाम शाळा व प्रताप आखाडा सुरू केला. रविवारी एखाद्या मैदानावर शारीरिक कवायती होत आणि गुरुवारी राजकीय वर्ग ज्यास पुढे 'बौद्धिक वर्ग' हे नाव पडले जे आजतागायत कायम आहे. परंतु पुढे या आखाड्यात आपसात संघर्ष सुरू झाले आणि संघटनेच्या दृष्टीने हे काही योग्य नाही हे डॉक्टरांनी ओळखले. हिंदु संघटनेचे हे पवित्र संस्कारकार्य केवळ गुरुवार-रविवार आणि व्यायाम शाळा चालवून होणार नाही म्हणून दैनिक शाखा ही अभिनव संकल्पना पुढे आली आणि प्रत्यक्ष संघ स्थानावर शाखा लागली ती १९२६ च्या चैत्र महिन्यात! दैनिक शाखा प्रारंभ करण्याचे निश्चित झाल्यावर प्रश्न उपस्थित झाला तो सुयोग्य स्थानाचा ! डॉक्टरांनी आपल्या सहयोगी सुहृदांसोबत या बाबतीत सखोल विचारविनिमय केला आणि अखेर क्रांतिकार्यातील डॉक्टरजींचे अत्यंत जवळचे मित्र भाऊजी कावरे यांच्या सल्ल्यानुसार स्थान ठरले..महालातील श्रीमंत साळूबाई मोहित्यांचा वाडा!

संघ स्थापनेनंतर स्थायी संघस्थान आणि कार्यालय असावे ही डॉक्टर साहेबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या हयातीत बरेच प्रयत्न देखील केले. सुरुवातीला नवी शुक्रवारीतील डॉक्टरांचे घर हेच संघ कार्यालय होते हे म्हणण्यावाचून प्रत्यवाय नाही. पुढे वॉकर रोडवरील ( हल्लीचे नाव रुईकर पथ) दशोत्तरांच्या वाड्यात संघ कार्यालयासाठी वीस रुपये मासिक भाडे देऊन जागा घेतली गेली. १९४५ पर्यंत दशोत्तर वाडा आणि शेषवाडा ही दोन संघ कार्यालये अस्तित्वात होती. परमपूजनीय डॉक्टर साहेबांच्या निधनापर्यंत मोहिते वाडा हा नागपूरातील प्रख्यात सावकार गुलाबसाव यांचेकडे ३ डिसेंबर १९०८ पासून गहाण होता. १९३० च्या जंगल सत्याग्रहात डॉक्टरांनी कारावास भोगल्यानंतर गुलाबसाव सावकाराने या ठिकाणी शाखा लावण्यास मनाई केली. या बिकट परिस्थितीत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले संघाच्या मदतीला धावून आले आणि भोसल्यांच्या हत्तीखान्यात शाखेचे स्थानांतरण झाले. पुढे हे स्थान ही सुटले आणि संघाची केंद्र शाखा तुळशीबाग झाली.

नियतीचा फेरा म्हणा की आणखी काही पण १९४१ मध्ये गुलाबसाव सावकार हा देखील कर्जाच्या विळख्यात सापडला आणि त्याला १२००० रुपयांची तात्काळ हुंडी देणे गरजेचे होते. तेव्हा गुलाबसावने परमपूजनीय श्रीगुरुजींशी संपर्क साधून सारा प्रकार कथन केला. प.पू. गुरुजींनी ३ दिवसात एवढी मोठी रक्कम उभी करून गुलाबसावला दिली आणि महाद्वार, त्यापुढील मैदानासह संपूर्ण मोहिते वाडा माधवराव सदाशिवराव गोळवलकर- श्रीगुरुजी यांच्या नावे ३० जून १९४१ रोजी खरेदी केला गेला. मोहिते संघ स्थानाजवळील आज जे पूर्वाभिमुख भवन आपणास दिसते त्याठिकाणी मातीचे घर होते. शमी वृक्षाकडील हे स्थान करवीर संकेश्वर पीठाचे श्रीमत् शंकराचार्य यांना श्री. गुपचूप परिवाराकडून दानात प्राप्त झाले होते. संकेश्वर मठाशी संपर्क साधून ती जागादेखील परमपूजनीय श्रीगुरुजींच्या नावे ७००० रुपयांत २५ सप्टेंबर १९४१ रोजी खरेदी केली गेली. १९४३ मध्ये मोहिते वाड्याच्या जागी संघ कार्यालय निर्मितीची योजना आखली गेली. डॉ हेडगेवार भवनाच्या निर्माण कार्यात प.पू. बाळासाहेब देवरस यांचे विशेष योगदान आहे. पूजनीय श्रीगुरुजी यांच्या सुचनेनुसार बाळासाहेबांनी या कामात स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या संपर्कातील स्थापत्यकार डी जी करजगावकर, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे एस सी केणी, पी जी खंबाटा, काका अभ्यंकर मंडळीची या कामासाठी योजना झाली. बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी नागपुरचे शरदराव सिर्सीकर व मुंबईतील नाना ठोसर या स्वयंसेवकांना नियुक्त करण्यात आले. १९४५ मध्ये संघाचे तीन मजली केंद्रीय कार्यालय बांधून पूर्ण झाले. अशारीतीने स्थायी संघ कार्यालय ही संघ निर्मात्यांची इच्छा पूर्णत्वास जाऊन साळूबाई मोहित्यांचा वाडा डॉ हेडगेवार भवन म्हणून ओळखल्या जाऊ लागला.

स्थायी कार्यालय झाल्यानंतर तत्कालीन पूजनीय सरसंघचालक श्रीगुरुजी, सरकार्यवाह व इतर प्रचारक मंडळी या कार्यालयात निवासी राहू लागली. सुरुवातीचे संघ शिक्षा वर्ग, प्रतिनिधी सभा याच कार्यालय परिसरात होत असत.आता निवासी कार्यालय म्हटले की भोजनादी व्यवस्था आल्याच; त्या या कार्यालयात देखील आहेत. पण आपला आजचा विषय आहे साडे तीनचा चहा! काय आहे हे प्रकरण? संघ संस्थापक पूजनीय डॉ हेडगेवार म्हणायचे चहा हे तर संघटनेचे अधिकृत पेय आहे.

तर महाल संघ कार्यालयातील स्वयंपाक घरात दुपारी साडे तीन वाजता चहाची घंटी वाजते. यावेळी कार्यालयात उपस्थित सर्वच कार्यकर्ते, अतिथी अभ्यागत चहा घ्यायला एकत्र येतात. परमपूज्य सरसंघचालक जर कार्यालयात असतील तर ते देखील सर्वांसमवेत चहा घेतात. मुळात हा *साडे तीनचा चहा म्हणजे शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है..* या संघगीताचे मूर्तिमंत कृतिरुप दर्शन आहे. मोठमोठे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते इथपासून सामान्य स्वयंसेवक इतकेच काय या कार्यकर्त्यांसोबत असलेले गाड्यांचे चालक हे देखील मुक्तपणे साडे तीनचा चहा प्यायला येऊ शकतात किंबहुना येतात. इतर ठिकाणी जसे वाहन चालकांची अथवा सेवा देणाऱ्या लोकांची वेगळी व्यवस्था असते तसे आपल्याला महाल कार्यालयात दिसणार नाही. बरं, हे आजचेच नव्हे तर अगदी परमपूजनीय गोळवलकर गुरुजींपासून आजतागायत सुरू आहे. चहा हे तर निमित्त असते, मात्र चहा पिताना सातमजली हास्य विनोद, परिवार कार्यकर्त्यांची ख्याली खुशाली यांची सहजपणे विचारणा होते. साडे तीनच्या चहाचे पूजनीय श्रीगुरुजींच्या काळातील तर अनेक किस्से जुनी मंडळी सांगू शकतील. श्रीगुरुजींना गरम गरम अगदी उकळता चहा लागत असे. तो उकळता चहा घेत घेत अगदी अटलबिहारी वाजपेयीपासून अखिल भारतीय संघ अधिकारी , प्रांतोप्रांतीचे प्रचारक इथपासून सामान्य बाल स्वयंसेवकापर्यंत सर्वांशी पूजनीय श्रीगुरुजी संवाद साधत. व्रतबंध -विवाहाचे निमंत्रण घेऊन येणाऱ्या मंडळींना देखील त्या त्या संस्काराचे महत्व कमी वेळात श्रीगुरुजी सांगत. पुढे परमपूजनीय बाळासाहेब, पूजनीय रज्जूभय्या, पूजनीय सुदर्शनजी आणि आता विद्यमान डॉ मोहनजी यांच्या काळांतही साडे तीनच्या चहाची परंपरा कायम आहे. पूजनीय सुदर्शनजींच्या सोबत मुल्ला मौलवी आणि इसाई पाद्री यांनी देखील साडे तीनचा चहा पीत पीत राष्ट्रीय प्रश्नांवर मंथन केले आहे. नागपूर - विदर्भातील माझ्यासह अनेक स्वयंसेवक बंधू व त्यांच्या परिवारातील घटकांनी या साडे तीनच्या चहाचा आस्वाद अनेकदा घेतला आहे.

डॉ. हेडगेवार भवन-महाल संघ कार्यालय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे केवळ केंद्रीय कार्यालय नसून लक्षावधी स्वयंसेवक आणि राष्ट्रजीवनातील असंख्य व्यक्तींच्या कार्याचे ऊर्जा केंद्र आहे. हजारो लाखो स्वयंसेवकांसह राष्ट्राची दशा आणि दिशा अवनतिकडून उन्नतीकडे नेण्याचे महत्कार्य या वास्तुने केले आहे. भारतीय जनमानसात, "मुझे गधा कहो मगर हिंदू मत कहो" इथपासून 'गर्व से कहो हम हिंदू है" हा प्रवास शक्य झाला तो केवळ आणि केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शब्दामागील अखंड साधना आणि आत्मीय व्यवहारामुळे. देशभरातील संघशाखांचे जाळे, सेवाकार्य, गतिविधी, विविध आयाम, आनुषंगिक संघटनांच्या रुपात सर्वव्यापी सर्वस्पर्शी विस्तारलेला संघ परिवार यामुळे संघ विचार वर्धिष्णू होत आहे आणि या जडणघडणीत महाल कार्यालयातील साडे तीनच्या चहाची देखील खारूताईची भूमिका आहे हे मान्य करावेच लागेल. जन्मशताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या संघटनेच्या सामान्य वाटणाऱ्या मात्र असामान्य छाप पाडणाऱ्या साडे तीनचा चहा या आत्मीयतेने भारलेल्या सामाजिक समरसतेच्या कृतीला वंदन!

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्
॥ भारत माता की जय ॥

डॉ भालचंद्र माधव हरदास
छायाचित्रे साभार:
अभिलेखागार-डॉ हेडगेवार भवन, महाल, नागपुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा