२०२२०६२६

हिन्दुराष्ट्र संघटकं सुजन वंदनीयम्‌

हिन्दुराष्ट्र संघटकं सुजन वंदनीयम्‌ ।
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥धृ॥ 

राष्ट्रमिदं हिन्दुनां खलु सनातनम्‌
विघटनया जातं चिर दास्य भाजनम्‌ ।
दुःखदैन्य पीडितमिति पीडित हृदयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥१॥ 

भगवध्वज एवराष्ट्र गुरुरयं महान्‌
देशोयं खलु देवो जगति महियान ।
उपदिशन्तमिति सारं दृढमाचरणीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥२॥ 

वीरव्रतमेव परं धर्म निधानम्‌
सुशीलमेव लोकेस्मिन परम निधानम्‌ ।
बोधयन्त मिति तत्त्वम्‌ सततस्मरणीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥३॥ 

नेतुम्‌ निजराष्ट्रमिदं परमवैभवम्‌
नयत विलयमंतर्गत सकल भेदभावम्‌ ।
संघमंत्रमिति जपन्त मेकमेशनीयम्‌
केशवं स्मरामि सदा परमपूजनीयम्‌ ॥४॥


२०२२०६२१

भारताच्या विश्वगुरूत्वास योगाचा आधार

भारताच्या विश्वगुरूत्वास योगाचा आधार - नरेंद्र गोळे

पृथ्वीवरील सर्व मनुष्य वसाहतींत, सर्वात पुरातन संस्कृती भरतखंडात नांदत आहे. त्यामुळेच आज, मानवी अनुभवाचा सर्वाधिक कालखंड लाभलेले क्षेत्र भारत हेच आहे. इजिप्त, ग्रीक, चीन यांसारख्या देशांतही अनेक पुरातन संस्कृती अस्तित्वात आहेत. मात्र त्या देशांतील संस्कृतींनी जपलेल्या मानवी-अनुभवलेखनाच्या पद्धती आपल्याइतक्या समृद्ध नाहीत. म्हणूनच आज आपल्या संस्कृतीस, कालांतरापासूनचे सर्व ज्ञान, निरंतर आणि अखंडित स्वरूपात सांभाळून ठेवण्यात दैदिप्यमान यश लाभलेले आहे. अशा आपल्या अनुभवसंपन्नतेपायीच आपण सदैव विश्वगुरू म्हणवले गेलेलो आहोत! हा लेख त्यातील ’योगा’चा वाटा विशद करतो.

भारतात जीवनातील सर्व अनुभवांचे वर्णन करण्यास समर्थ अशा भाषेचा विकास झाला. संस्कृतीसोबतच विकसित होत गेली ती संस्कृत भाषा. मात्र त्या काळी लिहिण्याची माध्यमे सीमित असत. भूर्जपत्रे, तालपत्रे ह्यांचा वापर अनुभवलेखनार्थ केला जाई. तरीही भारतीयांनी सर्व अनुभव सूत्ररूपांनी जपण्याचे धोरण ठेवले. अनुभवाचे सार सूत्ररूपे लिहिले जाई. मात्र पिढ्या-दर-पिढ्या वंशसातत्याने ते ज्ञान टिकून राहावे ह्यासाठी मुद्रित, लिखित, नाशिवंत माध्यमांचा वापर न करता, गेय सूत्रांत बद्ध केलेले ते अनुभवसार, मौखिक गुरूशिष्य-परंपरेने अभ्यासले, राखले, विकसित केले आणि हस्तांतरित केले जाई.

बळी तो कान पिळीह्या नैसर्गिक न्यायास मनुष्याने बुद्धीसामर्थ्याचे आधारे विफल ठरविले. एरव्ही अशक्त, दुर्बळ ठरणारा मनुष्य; त्याच्या अलौकिक बुद्धीसामर्थ्याने इतर सर्व शक्तिमान प्राण्यांहूनही सरस ठरला. मात्र मनुष्या-मनुष्यांतील वैमनस्यांत दोन्हीही बाजूंच्या बुद्धीवैभवाने, दोन्हीही पक्षांचा निरंतर र्‍हासच होत राहिला. ह्यावर उपाय म्हणून, परस्पर-सामंजस्याने मनुष्यमात्रांनी समाजशील राहून सृष्टीच्या निसर्गवैभवाचा आस्वाद घ्यावा, असा सुवर्णमध्य निघाला. सर्व मनुष्यांच्या एकत्रित बुद्धिमत्तेच्या तुलनेत एकट्या मनुष्याची बुद्धी तोकडी पडू लागली आणि मानवी सत्ता-साम्राज्यांचा उदय झाला. अशा साम्राज्यांत, प्रत्येक व्यक्तीने कशाप्रकारे यम-नियमांचे पालन केले असता सर्वात इष्ट, सर्वजनपरितोषक, संपन्न जीवनमान साकारता येईल ह्याचा शोध मग सर्वच समाज घेत राहिले. व्यक्तींनी व्यक्तींपुरते आणि समाजाचा घटक म्हणून कसे वागले असता सर्व प्राणिमात्रांचे कमाल हित साधले जाईल, त्या वर्तनास केवळवर्तन म्हटले जाऊ लागले. मुक्तवर्तन मानले जाऊ लागले. असे जीवन जगण्याच्या संधीस मग कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती समजले जाऊ लागले. अशा कैवल्याची किंवा मोक्षाची उद्दिष्टे मग निश्चित करण्यात आली. काय होती ती उद्दिष्टे? आज असे निस्संशयपणे सांगता येईल की ती उद्दिष्टेः

सर्वे सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामया: ॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःखभाग भवेत् ॥

अशा शब्दांत बांधण्यात आलेली होती. ह्या शब्दांचा अर्थ असा आहे की, सर्व सजीव सुखी व्हावेत, सर्व सजीव निरामय जीवन जगू शकावेत, सर्व सजीव कुशल राहावेत, कुणासही दुःख वाट्याला येऊ नये. प्रत्येकाने ह्या उद्दिष्टांना मनात ठेवून त्या धोरणास सुसंगत वागल्यास; असे जीवन प्रत्येकास खरेच साधता येईल, असाही विश्वास त्यामुळे निर्माण झाला.

आदर्शवत्‌ आचार कसा असावा ते सांगणारे आचारधर्म अस्तित्वात आले. ते न पाळल्यास मानवी सत्तांनी, ते न पाळणार्‍यांस दंडनीय ठरवले. त्याकरता दंडसंहिता निर्माण झाल्या. दंडसंहितेत न लिहिलेल्या नियमांकरता नैतिकतेची बंधने घालून पापपुण्याच्या संकल्पना प्रचलित करण्यात आल्या. मात्र इथे तो विचार करायचा नसून, केवळ आदर्श मानवी आचरण कसे असावे ह्याबाबत आपल्या पुरातन संस्कृतीत, जो शोध घेतला गेला आणि जे नवनीत त्यातून प्राप्त झाले त्याचाच विचार इथे करायचा आहे.

अनेक आचरणसूत्रांच्या समुच्चयाने संपन्न झालेल्या संहितेस मग योग म्हणू लागले. योगाचे वर्णन अष्टांग-योग असे केले जाऊ लागले. अष्टांगयोगानुसार वर्तन करत गेल्यास प्रत्येकासच, कैवल्य म्हणजेच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अशा निष्कर्षांप्रत आपले पूर्वज आलेले दिसतात.

भारतीय ब्रम्हविद्येचे लेखन वेळोवेळी, सूत्ररूपे होतच राहिले. गीतेत कृष्णाने अर्जुनास केलेल्या उपदेशास, व्यास मुनींनी शब्दबद्ध करून ठेवलेले आहे. गीतेतील, अनुष्टुभ छंदात लिहिलेले, ६९७ श्लोक, ब्रम्हविद्येचे सर्व सैद्धांतिक पैलू सविस्तर उलगडून दाखवण्यास समर्थ आहेत. त्याचप्रमाणे पतंजली मुनींनी १९५ योगसूत्रांत लिहून ठेवलेली योगसूत्रे जीवनातील अनुभवसाराचे प्रात्यक्षिक पैलू शब्दबद्ध करतात. भारतीय संस्कृती सूत्ररूपात एवढीच काय ती आहे. मात्र सूत्रांत सांगितलेले वर्ण्य विषय, उत्तम भाषाज्ञानाशिवाय सहजी आकलनयोग्य, राहत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्पष्टीकरणार्थ आपले वेद, आपली पुराणे, आपले योगशास्त्र इत्यादींची भर आपल्या संस्कृतीत सतत पडत गेली. ह्या सर्व संहितांत १४ विद्या आणि ६४ कलांनी संपन्न जनजीवनाची गुरूकिल्ली, भारतीय समाजाने आजही मुख्यतः मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेली आहे.

पातंजल योगसूत्रांचे वर्णन योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांनी, “भारतीय मानसशास्त्र” असेच केले आहे. पतंजलीमुनींनी सूत्रबद्ध केलेला योग म्हणजेच अष्टांगयोग. अष्टांगयोगात कैवल्य म्हणजेच मोक्षप्राप्तीचा मार्ग; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या टप्प्यांनी प्रगत होतो; असे सांगितलेले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रम्हचर्य हे पाच यम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत. दैनंदिन जीवनात यम-नियमांचे पालन करणे, अष्टांगयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. अशाप्रकारे व्रतस्थ जीवन जगत असता करावयाच्या आसनांनाच हल्ली योगअसे संबोधले जात असल्याने त्यांचे वर्णन वेगळ्याने करण्याची आवश्यकता नाही.

मात्र इथे एवढेच नमूद करायला हवे की, योगासने ही सावकाशपणे, शरीरास कुठेही त्रास न होता, पण शरीराची प्रत्येक स्वायत्तता हळूहळू विकास पावत राहावी अशा प्रेरणेने करायला हवीत. योगासनाच्या अंतीम स्थितीत काही मिनिटे टिकून राहता यायला हवे. सुमारे तासभर कुठलाही व्यायाम केल्याने रक्तदाब सुमारे १० मिलिमीटर पार्‍याइतक्या प्रमाणात वाढत असतो, तर कुठलीही योगासने सुमारे तासभर केली असता रक्तदाब सुमारे १० मिलिमीटर पार्‍याइतक्या प्रमाणात कमी होत असतो, असे प्रत्यक्षात आढळून आलेले आहे. आसनांचा उद्देश, समाधीसाधनार्थ एकाग्रताप्राप्तीसाठी, शरीर संपूर्ण शिथील करून, इष्ट ते आसन दीर्घकाळ टिकवून धरण्याची क्षमता प्रस्थापित करण्याचा असायला हवा.

अशी क्षमता प्रस्थापित झाल्यावर, मग श्वासनियंत्रण शिकून घेण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता असते. पतंजली मुनींच्या सूत्रांनुसार पूरक, कुंभक आणि रेचक अशा श्वसन अवस्थांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य मिळवणे हा प्राणायामाचा उद्देश असायला हवा. परिसरात सहज सामावून जायचे असेल तर, कुठलेही काम करत असता श्वासप्रच्छवास संथ आणि नियमितपणे होत राहायला हवा. तरच प्रत्याहारास योग्य अशी पोषक अवस्था निर्माण होऊ शकते.

अशी अवस्था निर्माण झाल्यावर, धनुष्यास प्रत्यंचा लावून, बाण सोडण्यापूर्वी जसा प्रत्यंचेत धरून, तो खेचून घेत असतात, तशी एकतानता आणि अचूक नेम साधण्याची प्रक्रिया, म्हणजेच प्रत्याहार. ह्याचाच व्यावहारिक अर्थ स्वस्थचित्त होणे, दत्तचित्त होणे आणि सावधचित्त होणे असा होतो.

ह्या प्रक्रियेत ज्या विषयावर ध्यान करायचे आहे, त्यावर नेम धरायचा असतो. त्या विषयाची निश्चिती म्हणजेच धारणाहोय. प्रत्येक व्यक्तीस स्वतःपुरते कार्यक्षेत्र नक्की झाले म्हणजे त्याची धारणा पक्की झाली असे म्हणता येईल.

धारणा ज्या विषयावर पक्की झालेली असेल त्या विषयावर मग मन एकाग्र करत जाण्याने योगः कर्मसु कौशलम्‌साध्य होत असते. अशी कौशल्यप्राप्ती हाच योग होय. त्याच विषयाच्या ध्यानात मग जीव गुंतू लागतो. एकाग्रता साधत जाते. व्यक्तीस जेव्हा अशी एकाग्रता साधत असते, तेव्हा समाधी लाभते, कैवल्य किंवा मोक्ष प्राप्त झाला असे म्हणता येते. प्रत्येक व्यक्तीस अशाप्रकारे मोक्षप्राप्ती झाली, तर सर्व समाजासच कैवल्यलाभ होऊन समाज स्थिरपद, सुखमय जीवन जगू शकतो. असेच ईप्सित मनाशी धरून अष्टांगयोगाची संहिता सिद्ध झालेली आहे.

निरामय, निरोगी जीवनात अष्टांगयोग कैवल्यप्राप्तीचा मार्ग दाखवतो. मात्र विकारवशात्‌ मनुष्याला त्या मार्गावरून चालणे शक्य होत नाही. त्यास पुन्हा आरोग्यप्राप्ती करवून देण्यासाठी आयुर्वेद निर्माण झाला. पतंजली मुनींनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता. मात्र अशा अभ्यासाची उद्दिष्टे राजा रंतिदेवाच्या खालील उक्तीत स्पष्टपणे अभिव्यक्त होतात.

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवम्‌ । कामये दुःखतप्तानां प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

ह्याचा अर्थ असा आहे की, मला राज्य नको, स्वर्ग नको, पुनर्जन्मही नको, मात्र सर्व दुःखपीडित प्राण्यांची दुःखे लयास जावोत अशीच माझी इच्छा आहे.

अशा प्रकारे कैवल्यप्राप्तीच्या मार्गावरून वाट चालत असता किंवा पुन्हा आरोग्यप्राप्त करत असताही, सदोदित प्राप्त होत राहणार्‍या अनुभवाची नोंद आपल्याच भावी काळाकरता, तसेच आपल्या भावी पिढ्यांच्या माहितीकरता, लिहून ठेवण्यास आवश्यक असणारे भाषाशास्त्रही पतंजली मुनींच्या अभ्यासाचा विषय होते. पतंजली महामुनी हे मोठे व्याकरणकार, योगदर्शनाचे प्रणेते व आयुर्वेदातल्या चरक परंपरेचे उद्गाते होत. भारतात होऊन गेलेल्या अग्रगण्य विद्वानांत पतंजलींची गणना होते. म्हणूनच त्यांना नमन करतांना राजा भर्तृहरीने आपल्या ’वाक्यपदीय’ ग्रंथाच्या प्रारंभी पुढील श्लोक लिहिला आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलीं प्रांजलिरानतोस्मि ॥ 

योगाने चित्ताचा, पदाने (व्याकरणाने) वाणीचा व वैद्यकाने शरीराचा मल ज्याने दूर केला, त्या मुनिश्रेष्ठ पतंजलीला मी अंजलिबंध करून नमस्कार करतो. पातंजल योगसूत्रांच्या प्रथम पादातील २४ वे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.

क्लेशकर्मविपाकाशयैः परामृष्टः पुरूषविशेषः ईश्वरः ।

योगशास्त्रात; अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेष हे पाचही क्लेश मानलेले आहेत. ज्यांच्यामुळे व्यक्ती कर्तव्यास तत्पर होत असते. कर्म केले की मग त्याचे फळही मिळत असतेच. चांगले किंवा वाईट. त्यास विपाक म्हणतात. ते फळ मिळेल अशी सूप्त आशाही मनात असतेच. ती आशा म्हणजेच आशय. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेष हे पाचही क्लेश; त्यांच्या प्रेरणेने करावी लागणारी कर्मे; त्या कर्मांमुळे लाभणारी त्यांची फले; आणि त्या फलांच्या दुःख-आनंद पर्यवसानांप्रती मनात असलेली आशा म्हणजेच आशय. ह्या सगळ्यांपासून अलिप्त असलेले पुरूष म्हणजे ईश्वर. ईश्वराच्या ह्या व्याख्येस गृहित धरूनच, प्रत्येक मनुष्यास ईश्वरत्वाचा अधिकार पोहोचतो. तो ईश्वर होऊ शकत असतो.

प्रत्येकाने ईश्वरच व्हावे. अशा ईश्वराने सर्व प्राणिमात्रांना पसायदान द्यावे. ज्यायोगे सर्व प्राणिमात्र चिरंतन, निरामय, सुखमय जीवन जगू शकतील, अशी प्रार्थना ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या समारोपात लिहून ठेवलेली आहे. इथे हे नमूद केले पाहिजे की, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांच्याच परिभाषेत भावार्थदीपिकाहोय. म्हणून गीतेचा मराठीत केलेला उद्बोध (अनुवाद) म्हणजेच ज्ञानेश्वरी. हे लक्षात घेता, ह्या सार्‍या वाक्‌-यज्ञाने संतोष पावून प्रत्येक व्यक्तीतील ईश्वराने समाजास काय द्यावे ह्याचे केलेले स्पष्ट विवेचन म्हणजे पसायदान’.

पसायदान

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज ज्ञावे । पसायदान हे ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥
चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकी इये । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

अशा रीतीने काय साध्य करायचे आहे ह्याबाबत व्यक्ती आणि समष्टी (लोकसमूह) ह्यांच्या कर्तव्यांचे निर्धारण झाले, तरीही त्याची माहिती समस्तांस, सतत होत राहणे गरजेचे असते. नाहीतर प्रत्येक व्यक्ती आणि समष्टीही; अपेक्षित, ईप्सित वर्तनाहून निराळे वागत राहतील, आणि चांगले काय ते माहीत असूनही, ते साधण्याची शक्यता शिल्लक राहणार नाही. यासाठी, अशा माहितीचा आणि सतत लाभत राहणार्‍या नवनव्या अनुभवांमुळे कायमच समृद्ध होत जाणार्‍या संकल्पनांचा, प्रचार व प्रसार जनमानसात निरंतर करतच राहावा लागतो.

२०२२०६१६

स्फुर्तिगान-४०: या उंच उंच नभी डोलतसे जो

तो भगवा रंग विराजे
भगवान नावही साजे ।
त्यागाची नौबत गाजे
वैभवे शोभला रायगडी जो, महान हा ध्वजराज ॥१॥ 

हे निशाण हिंदुत्वाचे
वीरांचे रणमर्दांचे ।
मातेच्या सत्पुत्रांचे
सकल हिंदु नमिताति जयाला, महान हा ध्वजराज ॥२॥ 

ज्यासाठी शिवबा लढला
बाजी प्रभु लढता पडला ।
संभाजी तो कडकडला
सोडिला सुळावर प्राण जयाने, महान हा ध्वजराज ॥३॥ 

सिंहगडी ताना पडला
वसईला अप्पा लढला ।
बाजीने दिल्लिस नेला
अटकेस राघवे फडकविला जो, महान हा ध्वजराज ॥४॥ 

पानिपती तोफा झडल्या
प्रेतांच्या राशी पडल्या ।
रक्ताने सरिता भरल्या
वाहिले लाख ते प्राण जयाला, महान हा ध्वजराज ॥५॥ 

झाशीचा ध्वज हा भगवा
त्या प्रणाम नित्य करावा ।
प्राणांत लढा लढवावा
शोभेल नित्यही उंच नभी जो, महान हा ध्वजराज ॥६॥


स्फुर्तिगान-१७: कोटि कोटि कंठातुन होतो

कोटि कोटि कंठातुन होतो ।
मातेचा जयकार ।
घडावा संघाचा संस्कार ॥धृ॥ 

भरतभूमिचे वीरपुत्र अम्ही
ध्यास एक हा सदा जीवनी ।
वैभवि नेण्या मातृभूमिला
संघ हाच आधार ॥१॥ 

प्रताप राणा शिवप्रभुबाजी
नररत्ने जन्मली इथे जी ।
त्या विरांचे आम्ही वंशज
स्वप्न करू साकार ॥२॥ 

तन मन धन हे आज समर्पुन
पूर्ण करू या हे जनजीवन ।
कीर्ति शिखरि हा चढवू भारत
हाच असे निर्धार ॥३॥ 

नित्य पूजनी भगवा ध्वज हा
स्मरा सांगतो पराक्रमाला ।
त्याग शिकवुनी स्फुरणहि देतो
हा गुरुचा अधिकार ॥४॥


स्फुर्तिगान-१५: तन-मन-धन अर्पून दक्षिणा

तन-मन-धन अर्पून दक्षिणा ।
ध्वजराजा तव आज अर्चना ॥धृ॥ 

कोसळत्या आभाळाखाली
परिस्थितीचे प्रहार झेली ।
धीट उभा हा संहत हिंदू
भाग्य रवीच्या दिव्य दर्शना ॥१॥ 

देहदंड का प्राणा बघतिल
विपदा कधि ध्येयास दडपतिल ।
छळनिंदांच्या झळा पचवुनी
तेजाळत ही तपःसाधना ॥२॥ 

या भूमीच्या रजःकणातुन
वरती तेजोमय गगनातुन ।
उठे भक्तिची ऋचा सुमंगल
तशीच अन्‌ भयद ती गर्जना ॥३॥ 

वैभवशाली राष्ट्रोत्थापन
याच व्रताचे धरिले कंकण ।
अखंड राहो हीच साधना
एवढीच तव पदी प्रार्थना ॥४॥


२०२२०६१५

३४८ वा शिवराज्याभिषेक वर्धापन सोहळा!


राजेंद्रप्रसाद रस्त्यावरील टिळकशाळा चौकातील बस स्टॉपवर साजरा झालेला
३४८ वा शिवराज्याभिषेक वर्धापन सोहळा!



संघटना हे एकच साधन

मनामनातील दुवा साधण्या । संघटना हे एकच साधन ।
संघटना हे एकच साधन । संघटना हे एकच साधन ॥धृ॥ 

जाती, भाषा, पंथ भेद किती । वैचित्र्याने नटली सृष्टी ।
परिएकता स्फुरण्या त्यातून । संघटना हे एकच साधन ॥१॥ 

सत्य अहिंसा शब्दच ठरले । कृतीतून पण शून्यच उरले ।
हिंदुत्वाचे ठरण्या भूषण । संघटना हे एकच साधन ॥२॥ 

चारित्र्याविन जीवन कसले । देवाविण का मंदिर सजले ।
स्वये स्थापण्या ते अनुशासन । संघटना हे एकच साधन ॥३॥ 

छिन्नभिन्न हा समाज होता । विश्वासही मग लोप पावता ।
सहकार्याचे जगण्या जीवन । संघटना हे एकच साधन ॥४॥ 

आत्मविस्मृती दूर सारुनी । मानवतेची मूल्ये स्थापुनी ।
राष्ट्रहिताचे करण्या चिंतन । संघटना हे एकच साधन ॥५॥

 

संघटनेला हृदय वहावे

स्नेहसूत्र हे करी धरावे । संघटनेला हृदय वहावे ॥धृ॥ 

बंधुत्वाचे विस्मृत नाते । हृदयी अमुच्या आज जागते ।
तेच निरंतर जगवायाते । श्रद्धेचे वरदान मिळावे ॥१॥ 

मणीबंधावर जरी हे कंकण । तरी हृदयातील उजळे कण कण ।
नैराश्याचा तिमिर झुगारून । तेजोमय मनमंदिर व्हावे ॥२॥ 

अखंड निष्ठा दृढ अनुशासन । प्रबल संयमित घडविल जीवन ।
सहज कुठेतरी घडता स्पंदन । घरोघरी स्वर तेच उठावे ॥३॥ 

सुखदुःखाची समान जाणीव । या भूमीचे घडविल वैभव ।
वीरव्रताचा करण्या आठव । रक्षाबंधन अमर रहावे ॥४॥

 

बोधपट

हिंदूंच्या अत्युच्च आकांक्षांचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला गुरूस्थानी मानलेले आहे. हिंदूंच्या संघटनेचा हा संघाचा प्रयत्न अत्यंत शास्त्रशुद्ध व ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. हजारो वर्षाच्या संघर्षमय जीवनात या हिंदू समाजाने खूप सोसले. असंख्य आक्रमणे व अत्याचारांना तोंड दिले. सारे समाजजीवन या प्रदीर्घ काळात पूर्णतः विस्कळित झाले. एकेकाळी सार्‍या जगाला सुसंस्कृत करण्याचे उत्तरदायित्व असलेले आम्ही अमृतपुत्र आहोत असा प्रबळ आत्मविश्वास असलेला हा समाज आत्मविस्मृत बनला. ही स्थिती समजून घेऊन त्याची चैतन्यशक्ती जागविण्याची प्रेरणा भ्गव्या ध्वजाशिवाय अन्य कुणात असू शकते?


हिंदु तेजा जाग रे

हिंदु तेजा जाग रे, जाग आता सावधान ।
घे प्रतिज्ञा जी करी, भारताचे पुनरुत्थान ।
भाग्यशाली हिंदुस्थान ॥धृ॥ 

शूर निधड्या छातीचे मोहरे मोठे जवान ।
झुंजती झेपावती जे प्रतापी वेगवान ।
भाग्यशाली हिंदुस्थान ॥१॥ 

शक्तिसंचय वाढवू त्यात होऊ एकतान ।
देहभान हरपवी हिंदु राष्ट्राचे निशाण ।
भाग्यशाली हिंदुस्थान ॥२॥ 

कालसागर संकटी वाढू दे मोठे तुफान ।
आण आम्ही घेतली पुनरुत्थान ।
भाग्यशाली हिंदुस्थान ॥३॥ 

संघ ही संजीवनी धर्म अमुचा स्वाभिमान ।
स्वामी हिंदु देशाचे हेच अमुचे राष्ट्रगान ।
भाग्यशाली हिंदुस्थान ॥४॥


भेंट अर्पण क्या करें?

विश्वगुरु तव अर्चनामें, भेंट अर्पण क्या करें? ।
जब की तन-मन-धन तुम्हारे और पूजन क्या करे? ॥धृ॥ 

प्राची की अरुणिमा छटा है यज्ञ की आभा विभा है ।
अरुण ज्योतिर्मय ध्वजा है दीपदर्शन क्या करे? ॥१॥ 

वेदकी पावन ऋचा से आजतक जो राग गुँजे ।
वंदना के उन स्वरों में तुच्छ, वंदन क्या करे? ॥२॥ 

रामसे अवतार आए कर्ममय जीवन चढाए ।
अजिर तन तेरा चलाए और अर्चन क्या करे? ॥३॥ 

पत्र-फल और पुष्प जल से भावना ले हृदय तल से ।

प्राण के पल पल विपल से आज आराधन करें ॥४॥

गाथा भारत विजयाची

जय हिंदुभू असे वेळ ही । आत्मपरीक्षण करण्याची ।
उठा आज घ्या शपथ आपुल्या । देशासाठी जगण्याची ।
देशासाठी जगण्याची । देशासाठी मरण्याची ॥धृ॥ 

मनोनिग्रहे करी असावी । निर्माणाची शक्ती नवी ।
पावलातल्या तरूण गतीला । मातृभक्तीची दिशा हवी ।
शब्दांनाही धार येऊ दे । देशाच्या अभिमानाची ॥१॥ 

क्रूर गिधाडे परसत्तेची । घात कराया टपलेली ।
सरली आता जरी न यादवी । जीवित आशा मग कुठली ।
आज परीक्षाखरी आपुल्या । संघटनेच्या शक्तीची ॥२॥ 

लोप जाहला जय नीतिचा । अनर्थ करता राज्य इथे ।
घरी स्वतःच्या परकेपण ये । मग देशाला स्थान कुठे ।
वेळ पातली भगवंताचे । चक्र सुदर्शन फिरण्याची ॥३॥ 

मनामनातील ईश जागवू । धर्मस्थापना पुन्हा करू ।
हिंदुत्वाच्या जय घोषाने । अंबर अवघे पुन्हा भरू ।
उभवू नभांतरी भगवा गाऊ । गाथा भारत विजयाची ॥४॥


करी बांधू या पवित्र कंकण

करी बांधू या पवित्र कंकण ॥धृ॥

इतिहासाच्या पानोपानी पूर्व दिव्य जे बसले लपुनी ।
रम्य भविष्याची त्यामधुनी भव्य मंदिरे पुन्हश्च उभवून ॥१॥ 

स्वार्थाचे ओलांडुनी कुंपण व्यक्तित्वाचा कोषही फोडून ।
विसरुनी अवघे अपुले मीपण विराट साक्षात्कार जागवून ॥२॥ 

जो हिंदू तो अवघा माझा घोष एक हा फिरुनी गर्जा ।
युक्तिमार्ग हा एकच समजा अन्‌ सर्वांना द्या समजावून ॥३॥ 

ध्वजराजाला साक्ष ठेवुनी आज बोलू या निश्चयवाणी ।
शुभसंकल्पा हीच पर्वणी राहील निष्ठा उरी चिरंतन ॥४॥

 

हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल

या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल । हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥ 

श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले । भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले ॥
श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले । ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ॥१॥ 

जातीपंथ भाषा, नको वृथा अभिमान । भेदांच्या भिंती पडोत सर्व गळोन ॥
निद्रेतुनी जागा व्हावा हिंदुस्थान । हे तेज जगाला निस्संशय दिपवील ॥२॥ 

आसाम असो पंजाब असो बंगाल । तो महाराष्ट्र वा कर्नाटक तामीळ ॥
हा अखंड भारत परि आसेतुहिमाचल । विविधतेतुनी एकता इथे प्रकटेल ॥३॥ 

हा समाज अपुला ध्येयापासुनी ढळला । हिंदूच हिंदुच्या विरोधात उठलेला ॥
परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला । कष्टाने अमुच्या देशभक्त होईल ॥४॥ 

राष्ट्राचा कराया घात कुणीधजतील । परकीय शक्तीला साथ कुणी देईल ॥
बलदंड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देईल । हा संघशक्तीचा साक्षात्कार घडेल ॥५॥


यह राष्ट्र विजयी हो हमारा

सार्वजनिक कार्यक्रमात पूज्य सरसंघचालकांच्या व्याख्यानापूर्वी हे गीत गायले गेलेले आहे.

राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खडा यदि देश सारा ।
संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ॥धृ॥

क्या कभी किस ने सुना है, सूर्य छिपता तिमिर भय से ।
क्या कभी सरिता रुकी है, बाँध से वन पर्वतों से ।
जो न रुकते, मार्ग चलते, चीर कर सब संकटॊं को ।
वरण करती कीर्ति उनका तोडकर सब असुर दल को ।
ध्येय मंदिर के पथिक को कण्टकों का ही सहारा ॥१॥ 

हम न रुकने को चले है, सूर्य के यदि पुत्र है तो ।
हम न हटने को चले है, सरित की यदि प्रेरणा तो ।
चरण अंगद ने रखा है, आ उसे कोई हटाये ।
दाहकता ज्वालामुखी यह, आ उसे कोई बुझाये ।
मृत्यु की पीकर सुधा हम, चल पडेंगे ले दुधारा ॥२॥ 

ज्ञान के विज्ञान के भी, क्षेत्र में हम बढ चलेंगे ।
नील नभ के रूप के नव अर्थ भी हम कर सकेंगे ।
भोग के वातावरण में, त्याग का सन्देश देंगे ।
दास्य के घन बादलों से, सौख्य की वर्षा करेंगे ।
स्वप्न यह साकार करने, संघटित हो हिन्दु सारा ॥३॥


नव्या युगाची हाक अम्हाला

नव्या युगाची हाक अम्हाला झेप आमुची यशाकडे ।
धमक कुणाची अडवायाची गती आमुची पुढे पुढे ॥धृ॥ 

नरसिंहाचे वंशज आम्ही रिपुरक्ताचे शिंपू सडे ।
बलवत्तर बाहूंवर तोलू आपत्तींचे घोर कडे ॥१॥ 

भीषण झंझा मोह निशा वा करू दे नर्तन चोहिकडे ।
आकाशाची कुर्‍हाड पडु दे तरिही राहू अढळ खडे ॥२॥ 

विजयश्रीला जिंकुन आणू उन्मत्तांना चारू खडे ।
खेचुन आणू स्वर्ग धरेवर आम्ही छातीचे निधडे ॥३॥ 

मृत्यूलाही तुडवून जाऊ ध्येयपथावर नित्य पुढे ।
व्यक्त्तिव्यक्तिचे हृदय पेटवू करी घेउनी दीप्त चुडे ॥४॥ 

स्वदेश उठता दिशादिशांतुन कोण करंटा देत दडी ।
देशभक्तिविण जीवन म्हणजे प्राणावाचुन व्यर्थ कुडी ॥५॥ 

देशासाठी जन्म आमुचा भूमातेस्तव देह पडे ।
मरून आम्ही जगास देऊ अमरत्वाचे नवे धडे ॥६॥


मंत्र छोटा तंत्र सोपे

मंत्र छोटा तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते ।
रीत साधी शिस्त बांधी, कार्य व्यापक उभवीते ॥धृ॥ 

व्यक्तीव्यक्ती जमवुनी भवती, जागृत करणे तयाप्रती ।
मनात प्रीती हृदयी भक्ती, सेवा करणे निस्वार्थी ॥१॥ 

असोत जाती नाती गोती, नसे तयांची आम्हा क्षिति ।
नकोच कीर्ती नको पावती, संघटनेने ये शक्ती ॥२॥ 

हिंदू अवघा बंधू बंधू, भारतभूचा पुत्र असे ।
वंदुनी माता गौरव गाथा, सार्थक त्याचे होत असे ॥३॥ 

युगायुगातून इतिहासातून, पराक्रमाची परंपरा ।
दरीदरीतून मैदानातून, चिरस्फुर्तिचा इथे झरा ॥४॥


उजाळिले तू तममय जीवन

उजाळिले तू तममय जीवन संघ युगाचा शालिवाहन ॥धृ॥

करून योग तव ज्वलंत प्रेरक मातीतूनही उठले सैनिक
वाण सतीचे घेऊन दाहक प्रकाश फुलवित अंधारातून ॥१॥

सामर्थ्यातून तत्वाचा जय धर्मरक्षण्या शक्तिसंचय
राष्ट्र आपुले हे मृत्युंजय तूच गायिले निज हवनातून ॥२॥

हिंदुत्वाचा विशाल सागर विभिन्नतेच्या लाटा वरवर
परी अंतरी एकच सुस्वर जागविले हे सत्य सनातन ॥३॥

तव शब्दांचे अमृत सिंचन देशाचे या फुलले यौवन
पुरुषार्थाचे जगण्या जीवन अगणित सेवक झिजले कणकण ॥४॥

महिमा आता संघ युगाचा विशालतेचा, उदात्ततेचा
जीवन इथले बहरविण्याचा तुझी तपस्या मंगल पावन ॥५॥

एकात्मता मंत्र

एकात्मता मंत्र

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०२२१

वृत्तः इंद्रवज्रा (अक्षरे-११)

 

यं वैदिका मन्त्रदृशः पुराणा
इन्द्रं यमं मातरिश्वानमाहुः
वेदान्तिनोऽनिर्वचनीयमेकं
यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति

इंद्रा यमा मातरिश्वापरी जे
ज्या देवता बोलत मंत्रद्रष्टे
वेदान्तियांना नच वर्णवे जो
ब्रह्मा जया बोलत कौतुके ते

शैवा यमीशं शिव इत्यवोचन्‌
यंवैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति
बुद्धस्तथाऽर्हन्निति बौद्धजैनाः
सत्‌-श्री-अकालेति च सिक्खसन्तः

ज्याला शिवा बोलत शैव लोक
विष्णू जया वैष्णव बोलतात
जैनांस अर्हन्व बौद्धांस बुद्ध
सत्श्रीअकाला म्हणतात शीख

शास्तेति केचित्‌ प्रकृतिः कुमारः
स्वामीति मातेति पितेति भक्त्याः
यं प्रार्थयन्ते जगदीशितारं
स एक एव प्रभुरद्वितीयः

शास्ता कुणी प्रकृति वा कुमार
मातापिता मालकतुल्य भावे
ज्या प्रार्थिती, जो जगतास त्राता
तो एकची देव न तुल्य कोण

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

अर्थ

प्राचीन काळचे मंत्रदृष्टी असलेले ऋषी ज्याला इंद्र, यम, मातरिश्वन् आदी वैदिक देवता (वैदिका) म्हणून संबोधतात, ज्या एका अवर्णनीय अद्वितीयाला वेदांती लोक ब्रह्मा म्हणून उल्लेखतात, शैव ज्याची शंकर म्हणून आणि वैष्णव ज्याची विष्णू म्हणून स्तुती करतात, बौद्ध आणि जैन ज्याला अनुक्रमे बुद्ध आणि अर्हन् म्हणतात, त्याचप्रमाणे शीख ज्याला ’सत् श्री अकाला’ म्हणून संबोधतात, ज्या जगत्रात्याला कोणी शास्ता, कोणी प्रकृती, कोणी कुमारस्वामी, कोणी माता, कोणी पिता मानून भक्तिपूर्वक प्रार्थना करतात, तो अद्वितीय ईश्वर एकच आहे.

https://anuvad-ranjan.blogspot.com/2022/02/blog-post.html