२०२२०६१५

नव्या युगाची हाक अम्हाला

नव्या युगाची हाक अम्हाला झेप आमुची यशाकडे ।
धमक कुणाची अडवायाची गती आमुची पुढे पुढे ॥धृ॥ 

नरसिंहाचे वंशज आम्ही रिपुरक्ताचे शिंपू सडे ।
बलवत्तर बाहूंवर तोलू आपत्तींचे घोर कडे ॥१॥ 

भीषण झंझा मोह निशा वा करू दे नर्तन चोहिकडे ।
आकाशाची कुर्‍हाड पडु दे तरिही राहू अढळ खडे ॥२॥ 

विजयश्रीला जिंकुन आणू उन्मत्तांना चारू खडे ।
खेचुन आणू स्वर्ग धरेवर आम्ही छातीचे निधडे ॥३॥ 

मृत्यूलाही तुडवून जाऊ ध्येयपथावर नित्य पुढे ।
व्यक्त्तिव्यक्तिचे हृदय पेटवू करी घेउनी दीप्त चुडे ॥४॥ 

स्वदेश उठता दिशादिशांतुन कोण करंटा देत दडी ।
देशभक्तिविण जीवन म्हणजे प्राणावाचुन व्यर्थ कुडी ॥५॥ 

देशासाठी जन्म आमुचा भूमातेस्तव देह पडे ।
मरून आम्ही जगास देऊ अमरत्वाचे नवे धडे ॥६॥


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा